कलम 144 | जमावबंदी लागू करणाऱ्या कायद्याविषयी जाणून घ्या सर्वकाही

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात 14 एप्रिल रात्री 8.00 वाजेपासून पुढील 15 दिवसांसाठी लॉकडाऊन लावण्यात आला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या काळात कलम 144 लागू करण्यात येईल.

संचारबंदी म्हणजे काय?
संचारबंदी म्हणजे कुणालाही पोलिसांच्या पूर्वपरवानगीशिवाय बाहेर पडता येत नाही, तर जमावबंदी म्हणजे तीन किंवा तीनपेक्षा अधिक लोकांना एकत्रितरीत्या बाहेर फिरता येत नाही.”

काय आहे कलम 144?
कलम 144 हे CrPC म्हणजेच The Code of Criminal Procedure (CrPC) मधील कलम आहे. यालाच मराठीत फौजदारी दंडसंहिता म्हणतात.

एखाद्या परिसरात जमाव एकत्र येऊन तिथली शांतता भंग करून दंगल माजवण्याची शक्यता असते, अशा ठिकाणी हे कलम लागू करतात. सोप्या शब्दात सांगायचं तर, जमावाने एकत्र येत कायदा हातात घेऊन हिंसाचार घडवू नये, यासाठी हे कलम लावलं जातं.

या कलमाला जमावबंदी किंवा संचारबंदी किंवा कर्फ्यू असंही म्हणतात.

जिल्हाधिकारी, जिल्हा न्याय दंडाधिकारी किंवा इतर कार्यकारी दंडाधिकारी नोटिफिकेशन जारी करून जमावबंदीचे आदेश देऊ शकतात.

कलम 144 लागू असलेल्या परिसरात हत्यारांची ने-आण करण्यावरही बंदी असते.

वर उल्लेख केलेले अधिकारी एखाद्या विशिष्ट परिसरातील कुठल्याही व्यक्तीला किंवा तिथल्या लोकांना किंवा त्या भागाला भेट देणाऱ्या लोकांना नोटीस बजावून एखादी कृती करण्यापासून रोखू शकतात. अर्थात अशी नोटीस बजावण्यासाठी काही नियम आणि अटी आहेत.

कलम 144 चं उल्लंघन करणाऱ्या किंवा पालन न करणाऱ्याला पोलीस अटक करू शकते. कलम 107 किंवा कलम 151 अंतर्गत ही अटक करता येते.

कलम 144 अंतर्गत वर्षभराच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. मात्र, हा जामीनपात्र गुन्हा असल्याने अटक झाल्यावर जामीन मिळू शकतो.

या कलमांतर्गत कोणत्याही परिसरात 2 महिन्यांसाठी जमावबंदीचे आदेश दिले जाऊ शकतात. मात्र नागरिकांच्या जिवाला धोका आहे किंवा दंगलीची शक्यता असल्यास सरकार 6 महिन्यांसाठीदेखील जमावबंदीचे आदेश देऊ शकते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *