शिवचरित्र भाग – 10 ( शाहिस्तेखानाची फजिती )

नमस्कार , मित्रांनो आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटातील महत्वाच्या घटना शिवचरित्र या आपल्या या लेखांच्या मालिकेतून पाहणार आहोत. मागील लेखात आपण पावनखिंडीतील लढा पाहिला. तरी या लेखात आपण शिवरायांनी शाहिस्तेखानाची फजिती कशी केली ते पाहणार आहेत. तरी अधिक माहिती वाचण्यासाठी आपण STAY UPDATED परिवारासोबत रहा.

विजापूरच्या आदिलशहाने जंग जंग पछाडले परंतु त्याला काही केल्या शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला धक्का लावता येईना. आदिलशहाच्या जवळपास प्रत्येक सरदाराला राजांनी धडा शिकवला. शेवटी आदिलशहा नरम झाला व त्याने नमते घेतले . आदिलशहा व शिवरायांमध्ये तह झाला. आदिलशहा ने राजांचे अस्तित्त्व मान्य केले व राजांनी आदिलशाही वर विनाकारण आक्रमण न करण्याचे वचन दिले. आता स्वराज्याची दक्षिणेकडुन लक्ष उत्तरेकडे गेले. उत्तरेला मुघलांचे भव्य साम्राज्य होते. राजांनी आता उत्तरेकडील बाजारपेठ, शहरे यांवर धाड टाकण्याचे काम सुरू केले. मुघल बादशाह या कारणांमुळे चिडी गेला व आपल्या मामा शाहिस्तेखान याला स्वराज्यावर चाल करून पाठवले.

स्वारी शाहिस्तेखानाची :-

शाहिस्तेखान हा 75 हजारांच्या वर सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून आला. त्याच्या सोबत मोठे हत्ती, उंट व तोफा होत्या. शिरवळ, शिवापूर व सासवड ही गावे घेत खान पुढे सरकत होता . पुढे त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. त्याच्याकडे अफाट सैन्य होते. परंतु या भागाची योग्य माहिती त्याला नव्हती या उलट मावळ्यांमध्ये सैन्य कमी परंतू या भागाची पूर्ण माहिती होती. मावळे खानाच्या प्रत्येक हरकतीवर नजर ठेवून होते. खानाने पुरंदरवर वेढा टाकला खरा परंतु मावळ्यांच्या गनिमी काव्यामुळे खानचे सैन्य पार वैतागून गेले यामुळे त्याने पुरंदरचा वेढा उठवला आणि तो पुण्याकडे वळाला.

पराक्रम फिरंगोजीचा :-

पुण्याच्या वाटेत खानाला चाकणचा किल्ला होता. खानाने हा किल्ला जिंकण्याचा निर्णय घेतला परंतु या किल्ल्याचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा हा होता. किल्ल्यावर मुबलक प्रमाणात सैनिक उपलब्ध नव्हते तरीही फिरंगोजीने खानासोबत लढण्याचे ठरवले. चाकणचा साधारण किल्ला जिंकायला खानाला 2 महिने लागले. आता खान विचार करू लागला की असेच चालू राहिले तर आपण हे संपूर्ण स्वराज्य कसे जिंकणार ??

फिरंगोजीचा शौर्यावर खुश होऊन खानाने त्यांना आपल्या सैन्यात सामील होण्यास सांगितले व सरदारकीचे अमिश दाखवले. परंतु फिरंगोजी बदला नाही. शेवटी खानाच्या प्रचंड मोठ्या तोफा व सैनिक बळापुढे चाकणचा किल्ला मुघलाच्या हातात गेला. पुढे खान पुण्यात आला व त्याने आपला तळ लाल महालात टाकला. एक वर्ष उलटले तरी खान हलेना, दोन वर्षे उलटले तरी हलेना या उलट तो अधून मधून प्रजेला प्रचंड त्रास देई. आपल्या सैन्याला पाठवुन गुरेढोरे व पिकांची नासधूस करी. आता या वर काही तरी उपाय करावा लागेल असे म्हणून शिवरायांनी योजना कार्याला सुरवात केली. पुणे भागात बहिर्जी नाईक व त्यांच्या सोबत गुप्तहेरांचे जाळे पसरवले. खानचे सैन्य व खानाबद्दलची माहिती मिळवण्यास सुरवात केली.

धाडसी बेत :-

खान लाल महालात होता हे एक दृष्टीने शिवरायांसाठी योग्यच होते. परंतु खानाने लाल महालात काही बदल केले होते. परंतु तरी वाड्यातील खोल्या, दालने, खिडक्या, दारे, वाटा व चोरवाटा यांची शिवरायांना सारी माहिती होती. आपण स्वतः लाल महालात घुसून खानाची खोड मोडावी हे राजांनी ठरवले. हा किती मोठा धाडसी बेत होता.

महालात शिरायला मुंगीलाही वाव नव्हता. लाल महालाभोवती 75 पेक्षा जास्त सैन्याचा डेरा होता. हत्यारबंद मराठ्यांना गावात यायलाच बंदी होती, पण शिवरायांनी निर्धार केला होता. आता सर्व बेत आखला. लग्नाच्या वरातीत घुसून लाल महालात घुसण्याचा बेत ठरला. सोबतीला येसाजी कंक, तानाजी मालुसरे, बहिर्जी नाईक यांच्या सारखे सहायक घेतले.

5 एप्रिल 1663 च्या रात्री वरतीतून राजे व त्यांचे साथी गावात घुसले. वरात पुढे गेली सर्वत्र शांतता झाली. शिवराय व त्यांचे माणसे लाल महलच्या भिंतीकडे सरकले. या वेळी शाहिस्तेखान गाढ झोपला होता.

शाहिस्तेखानाची खोड मोडली :-

वाड्याच्या भिंतीला भगदाड पाडून राजे व त्यांचे सहकारी आत शिरले. खानचे पहारेकरी पेंगत होते. शिवराय आणखी आत शिरले. काही पाहरेकऱ्यांना बांधून टाकले. परंतु काही त्यांच्या वर धावून आले सोबत एक खानाचा मुलगा राजांवर धावून आला. राजांची व त्याची झटापट झाली. राजांनी त्याला ठार केले. लोक जागे झाले, गडबड  झाली. राजांना वाटले की खान ठार झाला परंतु नंतर लक्षात आले की तो त्याचा मुलगा होता.

पुढे राजे थेट खानच्या शयन कक्षात गेले. शाहिस्तेखान घाबरला.“ सैतान! सैतान!! ”म्हणत ओरडत पळू लागला. शिवराय त्याच्या मागे पळाले. शाहिस्तेखान खिडकीवाटे बाहेर उडी टाकणार याच्या आत शिवरायांनी खानावर वार केला. खानाची तीन बोटे कापली. परंतु खान खिडकीतून उडी टाकून पळाला.

शिवाजी आला, धावा पकडा त्याला ’जिकडे तिकडे हाच स्वर उठू लागला. कोणाचा कोणाला काही संपर्क साधेना. खानाचे सैन्यात कोणी शिवाजीला पाहिले नव्हते मग ओळखणार कसे ??  तरीही सर्वजण सैरावैरा धावू लागले. या परिस्थितीचा फायदा घेत राजे व त्यांचे मावळे स्वतःही ओरडू लागले की ‛शिवाजी आला ! पकडा त्याला ’ म्हणत ओरडु लागले व या गडबडीत सिंहगडाकडे रवाना झाले. खानाची माणसे राजांना रात्रभर सापडत राहिले.

शाहिस्तेखानाने तर हायचं खाल्ली. ‛ आज बोटे तुटली , उद्या आपले शीर शिवाजी कापून नेईल ’ अश्या भीतीने खानाचे मन ग्रासले. तो 3 दिवसाच्या आताच पुणे सोडून निघाला. या प्रकाराने औरंगजेब प्रचंड चिडला.

औरंगजेबाने शाहिस्तेखानाची रवानगी बंगाल प्रांतात केली. मुघल सत्तेला बसलेला हा पहिला तडाखा होता. शिवराय फत्ते होऊन आले. परंतु औरंगजेब आता प्रचंड चिडला होता.

पुढील लेखात आपण मिर्झाराजे जयसिंग व  पुरंदरचा वेढा पाहणार आहोत. तरी वाचत रहा शिवचरित्र आपल्या STAY UPDATED परिवारासोबत…

[ टीप : हा लेख विविध पुस्तकांच्या वाचनातून तसेच इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवरून लिहण्यात आला आहे. तरी या लेखामध्ये काही चुका किंवा त्रुटी आढळ्यास आम्हाला कमेंट करून किंवा ७०२०३३३९२७ क्रमांकावर व्हाट्सअँप मेसेज करून नक्की कळवा . आम्ही लेखामध्ये त्वरित बदल करून घेऊ. ]

Leave a Comment

Your email address will not be published.