शिवचरित्र भाग – 13 ( गड आला पण सिंह गेला )

नमस्कार , मित्रांनो आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटातील महत्वाच्या घटना शिवचरित्र या आपल्या या लेखांच्या मालिकेतून पाहणार आहोत .मागील लेखात आपण बादशहाच्या हातावर राजांनी तुरी दिल्या ते  पाहिले. तरी या लेखात आपण राजांची गड जिंकण्याची पुनरमोहिम व कोंढाणा ( सिंहगड) पाहणार आहेत .तरी अधिक माहिती वाचण्यासाठी आपण STAY UPDATED परिवारासोबत रहा .

माँ साहेबांची इच्छा :-

शिवरायांनी जयसिंगला 23 किल्ले दिले परंतु अजुनही त्यातले बरेच मुघलांच्या ताब्यात होते. त्यातील एक होता कोंढाणा, कोंढण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या ताब्यात असणे जिजाबाईना मंजूर नव्हते. त्या राजांना म्हणाल्या ‛ शिवबा कोंढाणा मुघलांच्या ताब्यात असणे योग्य नाही. तो लवकर परत घ्या.’ आऊसाहेबांची इच्छा ती ! राजांसाठी ती आज्ञाच. म्हणून राजे कामाला लागले. परंतु कोंढाणा घेणे अत्यंत अवघड काम होते. पुण्याजवळील हा किल्ला अत्यंत अवघड व कठीण किल्ला होता.

या कामगिरीला फत्ते करण्यासाठी राजांनी कोणाला निवडावे हा पेच होता. कोंढण्यासारखा किल्ला घेणे म्हणजे जीवावर उदार झाल्या सारखी गोष्ट होती. राजांना या कामगिरीसाठी सर्वात प्रथम आठवण आली ती म्हणजे तानाजी मालुसरे यांची.

तानाजी मालुसरे :-

आरंभीच्या काळापासून राजांचा सहायक म्हणून तानाजी मालुसरे ओळखले जातात. शाहिस्तेखानाची फजिती कार्यापासून तर अनेक मोठ्या मोठ्या स्वार्यांपर्यंत तानाजी राजांसोबत उभा होता. कोकणातील महाडजवळ उमरत नावाचे गाव तानाजीचे होते. शिवरायांच्या कामात दिरंगाई , कुचराई तानाजीला माहीतच नव्हते. शिवराय म्हणतील ती कामगिरी करण्यात तानाजी केंव्हाही तयार ! मोठा हिम्मतवान गडी ! अंगाने धिप्पाड होता. बुद्धीने चलाख व शिवरायांवर अलोट भक्ती होती.

आधी लग्न कोंढण्याचे मग माझ्या रायबाचे :-

राजांना तानाजीचे नाव सुचूनही राजानी हे नाव टाळले. याचे कारणही तसेच होते तानाजी आपल्या एकुलत्या एक मुलाच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त होता. तानाजीच्या घरी त्याचा मुलगा रायबाच्या लग्नाची जोरदार तयारी चालू होती. लग्न आता 4 दिवसांवर येऊन ठेपले होत.

रायबाच्या लग्नाचे आमंत्रण घेऊन तानाजी हा माँसाहेब व राजांकडे आला. सोबत शेलारमामा व भाऊ सूर्याजी तर होतेच. परंतु राजे म्हणाले ‛ आम्ही रायबाच्या लग्नाला येऊ शकत नाही, आम्ही कोंढाणा फत्ते करण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत.’ शिवरायांचे हे शब्द ऐकताच तानाजी म्हणाला ‛ राजे आम्ही जिवंत असताना आपण स्वतः आपल्या जीवावर उदार होऊन कामगिरीवर जाणार? मग आम्ही का ? ते बाकी काही नाही.आता आधी लग्न कोंढण्याचे मग माझ्या रायबाचे . कोंढण्याच्या कामगिरीवर मीच जाणार व मला आशीर्वाद द्या. ’ राजे निरुत्तर झाले. काय बोलणार आता राजे ? स्वतःच्या मुलाचे लग्न सोडून किल्ला सर करण्याची कसली ही ओढ? किती ती स्वामीभक्ती ? आणि काय ते स्वराज्याप्रति प्रेम ? अद्धभूतच!

बेत आखला :-

तानाजी कोंढण्याच्या स्वारीवर निघाला. कोंढाणा किल्ल्यावर जयसिंगाने नेमलेला उदयभान हा राजपूत किल्लेदार होता. तो मोठा कडक व शिस्तबद्ध होता. तसे गडाला 2 दरवाजे होते. परंतु दोन्ही दरवाजावर उदयभानाने कडक बंदोबस्त लावला होता. मग आता प्रश्न होता की गडावर जायचे कसे? तानाजीने गडाभोवती टेहळणी केली. पश्चिम बाजूला उंचच एक कडा होता. परंतु त्या बाजूने जास्त पहारा नव्हता. तानाजीने कडा चढून जाण्याचा बेत आखला. भाऊ सुर्याजीकडे दुसऱ्या बाजूची काम दिल.‛ सूर्याजी, तू 500 गडी घेऊन कल्याण दरवाजा गाठ. मी 300 मावळे घेऊन कडा चढून गडावर जातो. गड चढताच आम्ही कल्याण दरवाजा उघडू मग या तुम्ही पण आत, मग सोबतच धुव्वा उडवू शत्रूचा, चला.’ असे म्हणत तानाजी व सूर्याजी वेगळ्या वेगळ्या वाटेनं निघाले.

रात्रीची वेळ होती. तानाजी व त्याचे मावळे गडाच्या पायथ्याशी एकदम अंधारात उभे होते. घोरपडे बंधू म्हणून एकदम सडपातळ असे गडी आता कडा चढायला सुरुवात केली. केवढा उंच तो कडा! पण ते कपारिस धरून, कोठे फटीत बोटे घालून मोठ्या हिमतीने कडा चढून वर गेले. वर जाताच दोराचे टोक एका झाडाला घट्ट बांधले मग काय? तानाजी व त्याचे मावळे दोरावरून भरभर वरती चढले.

तानाजीचा पराक्रम:-

इकडे सुर्याजीने आपल्या मावळ्यांच्या सोबत कल्याण दरवाजा गाठला. आतमध्ये लढाईला सुरवात झाली. उदयभानला  खबर लागली. नगारा वाजला. उदयभानचे सैन्य मावळ्यांवर चाल करून आले. हातघाईची लढाई सुरू झाली. तलवारीला तलवारी भिडल्या. सपासप वर होऊ लागले. ढाली खनानु लागल्या  मशालींचा नाच सुरू झाला. मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला. तानाजी सिंहासारखा लढत होता. उदयभानने त्याच्यावर झेप घेतली. दोघांची झुंज सुरू झाली. दोघेही शूर वीर! कोणी मागे हाटेना. एवढ्यात तानाजीची ढाल तुटली. तानाजीने हातात शेला गुंढळला व शेल्यावर वार झेलत लढू लागला. शेवटी दोघेही एकमेकांच्या वारांनी जखमी झाले आणि धारतीर्थी पडले.

गड आला पण सिंह गेला:-

तानाजी पडला हे पाहून मावळ्यांचा धीर खचला व ते पळू लागले. इतक्यात कल्याण दरवाजा उघडून सूर्याजी व त्याचे मावळे आतमध्ये आले. आपला भाऊ पडला हे पाहून सुर्यजीला दुःख तर झाले. परंतु ही वेळ दुःख करण्याची नव्हतीच. लढण्याची होती. पळत जाऊन सुर्याजीने कड्यावरचा दोर कापून टाकला. पळणाऱ्या मावळ्यांना आडवा गेला व म्हणाला ‛ अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे. तुम्ही असे भागूबाई सारखे काय पळता? मागे फिरा. मी कड्याचा दोर कापून टाकला आहे . एक तर कड्यावरून उड्या टाकून मरा नाही तर शत्रूला मारून जिवंत रहा. ’

मावळे मागे फिरले. पुन्हा लढाईला सुरवात झाली. धारतीर्थी पडला असे वाटलेला उदयभान अझुणही लढत होता. शेलार मामा व उदयभान यांच्यात द्वंद्वव लागले. शेलारमामाचा वार जिव्हारी लागून आता मात्र उदयभान धारतीर्थी झाला. गड सर झाला, पण तानाजी सारखा हिरा स्वराज्याने गमावला. ही बातमी जिजाबाई व शिवराय यांच्या पर्यंत पोहचली. त्याना प्रचंड दुःख झाले. गड ताब्यात आला पण सिंहासारखा तानाजी गेला. शिवराय म्हणाले ‛ गड आला पण सिंह गेला! ’

कोंढण्याचे नाव या घटनेमुळे पुढे सिंहगड म्हणून सार्थक झाले. ही घटना 1670 मधली व पुढे राजांनी स्वतः उमरत गावी जाऊन तानाजीचा पुत्र रायबाचे लग्न लावून दिले. धन्य तो वीर तानाजी, धन्य ते मावळ्यांचे स्वराज्य प्रेम, धन्य ती त्यांची स्वामी भक्ती!!

पुढील लेखात आपण शिवरायांचा राज्याभिषेक पाहणार आहोत . तरी वाचत रहा शिवचरित्र आपल्या STAY UPDATED परिवारासोबत …

[ टीप : हा लेख विविध पुस्तकांच्या वाचनातून तसेच इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवरून लिहण्यात आला आहे. तरी या लेखामध्ये काही चुका किंवा त्रुटी आढळ्यास आम्हाला कमेंट करून किंवा ७०२०३३३९२७ क्रमांकावर व्हाट्सअँप मेसेज करून नक्की कळवा . आम्ही लेखामध्ये त्वरित बदल करून घेऊ. ]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *