शिवचरित्र भाग – 14 ( सोहळा अखंड स्वराज्याचा )

नमस्कार , मित्रांनो आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटातील महत्वाच्या घटना शिवचरित्र या आपल्या या लेखांच्या मालिकेतून पाहणार आहोत .मागील लेखात आपण तानाजी मालुसरे व किल्ले कोंढाणा( सिंहगड)  पाहिले. तरी या लेखात आपण राजांचा राज्यभिषेक पाहणार आहेत .तरी अधिक माहिती वाचण्यासाठी आपण STAY UPDATED परिवारासोबत रहा .

राज्यभिषेक का ? :-

रायरेश्वरासमोर शिवरायांनी व काही मावळ्यांनी मिळून स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा केली. या कार्यात त्यांच्यावर कित्येक संकट आली, पण या सर्वातून राजे मोठया शौर्याने तर कधी चातुर्याने पार पडले. लढता लढता अनेक सहकाऱ्यांनी आपला प्राण गमावला बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे , मुरारबाजी, शिवा काशीद यांसोबतच अनेक मावळे धारातीर्थी पडले. या अथक प्रयत्नांतर स्वराज्य उभे राहिले. शत्रूवर वचक बसला.

या स्वराज्याला इतर राजे राजवाड्यानी मान्यता द्यावी म्हणून राजांनी राज्याभिषेकाचा बेत आखला. कित्येक शेकडो वर्षानंतर सर्व धर्माना समान वाजवणारा, प्रजेला न्याय व सुख देणारा राजा या महाराष्ट्र भूमीत निर्माण झाला होता. हे राज्य सर्वांसाठी समान आहे, हे या जगाला समजल पाहिजे म्हणून राजांनी राज्याभिषेक करण्याचे ठरवले.

राजधानी दुर्गेश्वर रायगड:-

राज्य निर्माण झाले आता वेळ होती राज्याच्या राजधानीची, यासाठी राजांच्या नजरेत जावळीचा भक्कम असा रायगड समोर होता. रायगडावरून संपूर्ण स्वराज्यावर देखरेख करणे सोपे होते. शत्रूवर नजर ठेवणे सोपे होते. रायगड हा एक भक्कम किल्ला होता. सोबत मराठ्यांची ओळख असलेल्या गनिमी काव्याच्या युद्धनीतीच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असल्या स्थानी होता.

तयारी समारंभाची :-

राजांनी चिपळूण ला जाऊन सैन्याची पाहणी केली. प्रतापगडावर आई भवानीचा आशीर्वाद घेतला. भवानी मातेला सोन्याचे छत्र अर्पण केले. नंतर शिवरायांनी सोन्याचे सिंहासन तयार करून घेतले. त्याला मौल्यवान रत्ने जडली होती. 32 मण सोन्याचे सुवर्ण सिंहासन दुर्गेश्वर रायगडावर प्रस्थापित करण्यात आले. त्यावर शुभ्र छत्र बसवले. राजेरजवाडे, विद्वान , पुरोहित , सरदार व कामदार सर्वांना आमंत्रण गेले. राज्याभिषेकाचा पौरोहित्य करण्यासाठी काशीवरून गागाभट्ट यांना बोलवण्यात आले.

शिवरायांनी राज्यभिषेकाची तयारी यथासांग केली. सप्तगंगा आणि तिन्ही समुद्राचे जल आणले गेले. रायगडावर सुमारे 50 हजार माणसे जमली. त्यासाठी सर्वत्र तंबू, राहुट्या व डेऱ्यांची सोया करण्यात आली.

एक अद्वितीय सोहळा:-

राज्याभिषेकाचा दिवस उजाडला. महामंगल दिवसच तो. वाद्य वाजू लागली.सगळीकडे आनंद पसरला होता. शिवराय सोन्याच्या चौरंगावर बसले. त्यांच्यावर छत्रचमर धरण्यात आले. तूप, दही, मध यांचे कलश पुरोहितांच्या हातांत होते. गागाभट्ट यांच्या हातात सोन्याची घागर होती. तिच्यात गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी , कावेरी, नर्मदा आणि कृष्णा या नद्यांचे पाणी होते. घागरीच्या 100 छिद्रांतून राजांचा जलाभिषेक झाला. मग राजांनी आई व राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पाया पडले. त्यांच्या डोळ्यातुन आनंदाश्रू वाहू लागले. त्यानी केलेल्या तीस वर्षांच्या कष्टाचे चीज झाले. स्वतःच्या मनात धरलेलं आपलं राज्य आज अस्तित्वात आले याच समाधान माँसाहेब जिजाऊंना झाले.

नंतर राजे आपल्या सिंहसनाकडे निघाले. आपल्या सिंहासनावर चढताना राजांच्या डोळ्यात अश्रू आले. आपले सर्व साथीदार मावळे ज्यांनी स्वराज्यासाठी आपला जीव गमावला त्या सर्वांची आठवण राजांना झाली. नंतर राजे सिंहासनावर विराजमान झाले. जवळ महाराणी सोयराबाई व युवराज संभाजी राजे एका बाजूस बसले. बाजूस अष्टप्रधान मंडळी उभे राहिले. गागाभट्ट यांनी सोन्यामोत्याच्या झालरीचे छत्र राज्यांच्या डोक्यावर धरले व मोठ्याने म्हणाले

आस्ते कदम
महाराsssssज
गडपती
गजअश्वपती
भूपती
प्रजापती
सुवर्णरत्नश्रीपती
अष्टवधानजागृत
अष्टप्रधानवेष्टित
न्यायालंकारमंडित
शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत
राजनितिधुरंधर
प्रौढप्रतापपुरंदर
क्षत्रियकुलावतंस
सिंहासनाधिश्वर
महाराजाधिराज
राजाशिवछत्रपती
महाराजांचा विजय असो.”

सर्वांनी जयजयकार केला. गडांवर तोफांचा गडगडाट झाला. या प्रकारे सन 6 जून 1674 मध्ये माझा राजा छत्रपती झाला. त्याच दिवशीपासून महाराजांनी ‛ राज्यभिषेक ‘ हा शक सुरू केला. शिवराय शककर्ते झाले. त्यानी आपली स्वतंत्र नाणी पाडली. निरनिराळ्या देशांचे वकील या समारंभाला हजर होते.

शिवरायांच्या राज्यभिषेकाची कीर्ती सर्वत्र पसरली व स्वराज नावाची संकल्पना हळू हळू संपूर्ण जगात गाजली.

पुढील लेखात आपण राजांवर दुःखाचा डोंगर व दक्षिण मोहिमेची सुरवात पाहणार आहोत . तरी वाचत रहा शिवचरित्र आपल्या STAY UPDATED परिवारासोबत …

[ टीप : हा लेख विविध पुस्तकांच्या वाचनातून तसेच इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवरून लिहण्यात आला आहे. तरी या लेखामध्ये काही चुका किंवा त्रुटी आढळ्यास आम्हाला कमेंट करून किंवा ७०२०३३३९२७ क्रमांकावर व्हाट्सअँप मेसेज करून नक्की कळवा . आम्ही लेखामध्ये त्वरित बदल करून घेऊ. ]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *