माहित आहे का ? कोव्हिशिल्ड लशीच्या दोन डोसमधलं अंतर का वाढवलं ?

ऑक्सफर्ड विद्यापीठात संशोधन झालेल्या कोव्हिशिल्ड लशीचा दुसरा डोस आता 12 ते 16 आठवड्यांनी देण्यात यावा, असं केंद्र सरकारने जाहीर केलं आहे. यापूर्वी दोन डोसमधलं हे अंतर 6 ते 8 आठवड्यांचं होतं.

कोव्हिड निवारणासाठी नेमलेल्या कार्यकारी गटाचे प्रमुख डॉ. एन के अरोरा यांनी एका संशोधनात तशी शिफारस आरोग्य मंत्रालयाकडे केली होती. हे अंतर वाढल्यामुळे लशीची परिणामकारकता वाढते, असं संशोधनात म्हटलं होतं.

सध्या भारतात लशीच्या तुटवड्यामुळे अनेकांना दुसरा डोस मिळवण्यात अडचणी येत आहेत. अशा लोकांसाठी हा मोठा दिलासा म्हणावा लागेल. लशीचा दुसरा डोस उशिरा घेतल्यामुळे नेमका काय फरक पडणार आहे हे जाणून घेऊया.

कोव्हिशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर का वाढवलं ?

बहुतेक कोरोना लशींचे दोन डोस घ्यायचे असतात. लशींमुळे तुमच्या शरीरात त्या आजाराशी लढा द्यायला अँटीबॉडीज तयार होऊ लागतात.

पहिल्या डोसनंतर सावकाश म्हणजे 2-3 आठवड्यात काही प्रमाणत अँटीबॉडीज निर्माण होतात. पण दुसरा डोस घेतल्यावर या प्रक्रियेला गती मिळते.

लशीच्या या दुसऱ्या डोसला बुस्टर डोस असं म्हटलं जातं. म्हणजे पहिल्या डोसला पूरक आणि वर त्याची ताकद वाढवणारा डोस.

भारतात कोव्हिड निवारणासाठी नेमलेल्या कार्यकारी गटाचे प्रमुख डॉ. एन के अरोरा यांनी अलीकडेच सरकारला शिफारस केली होती की, कोव्हिशिल्ड लशीच्या दोन डोसमधलं अंतर वाढवण्यात यावं.

ऑक्सफर्ड विद्यापीठातच मार्च 2021मध्ये यावर संशोधन झालं होतं. आणि त्यानंतर असा निष्कर्ष काढण्यात आला की, दोन डोसमधलं अंतर 12 ते 16 आठवडे असेल तर लशीची परिणामकारकता वाढते.

युके, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेतल्या 17187 लोकांवर यासाठी लशीचे प्रयोग करण्यात आले. सहा आठवड्यांपेक्षा कमी अंतराने दुसरा डोस दिला असेल तर परिणामकारकता 55.1% आणि किमान 12 आठवड्यांचं अंतर असताना हीच परिणामकारकता 81.3% असल्याचं दिसून आलं.

भारत सरकारने सुद्धा आता या अहवालावर आधारित भारतीय सल्लागार समितीचे निष्कर्ष मान्य करून डोसमधलं अंतर अधिकृतरित्या वाढवलं आहे.

परिणामकारकता आणि लशीपासून मिळणारं संरक्षण

कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधलं अंतर दुसऱ्यांदा वाढलंय. यापूर्वी मार्च महिन्यात केंद्रसरकारने आधीच्या 4 आठवड्यांच्या अंतरावरून दोन डोसमधलं अंतर 6 ते 8 आठवडे करा असं राज्यांना कळवलं होतं.

आता काल काल केंद्र सरकारने जे अधिकृत पत्रक काढलंय त्यात त्यांनी स्पष्ट केलंय की डोसमधलं अंतर वाढवण्याचा निर्णय रियल लाईफ एक्स्पिरियन्स म्हणजे लस दिली जात असताना येणारे अनुभव आणि ताजा डेटा बघून घेण्यात आलाय.

लस शरीरावर कसं काम करते यासाठी दोन निकष वापरता येतात एक म्हणजे लशीची परिणामकारकता आणि दुसरं म्हणजे रोगापासून ही लस किती संरक्षण देते याचा अभ्यास.

लशीची परिणामकारकता वाढते हे तर ऑक्सफर्डमध्येच झालेल्या संशोधनातून स्पष्ट झालंय. रोगापासून संरक्षण देण्याविषयी जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्लागार डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी अलीकडेच प्रतिक्रिया दिली होती. त्या म्हणाल्या, “लशीच्या दोन डोसमध्ये नेमकं किती अंतर हवं हे तुम्ही कुठली लस घेताय यावर अवलंबून आहे. शिवाय त्या त्या देशात सरकारने डोस नेमके कधी घ्यायचे याविषयी मार्गदर्शक तत्त्वंही घालून दिलेली असतात. सध्या उपलब्ध असलेल्या बऱ्याचशा लशी या तीन ते चार आठवड्यांच्या अंतराने दिल्या जातायत. पण, कोव्हिशिल्ड लशीच्या बाबतीत एक संशोधन असं सांगतं की, दुसरा डोस बारा आठवड्यांनी दिला तर लोकांमध्ये रोगप्रतिकारकशक्ती जास्त प्रमाणात वाढते.”

लशीच्या दोन डोसमधलं अंतर वाढवण्याच्या निर्णयाचं कोव्हिशिल्ड लशीचं भारतात उत्पादन करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटच्या आदर पुनावाला यांनीही स्वागत केलंय.

तर अमेरिकन सरकारचे कोव्हिड सल्लागार डॉ. अँथनी फाऊची यांनीही सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते, “दोन डोसमधलं अंतर वाढवणं हा समजूतदारपणाचा निर्णय आहे. एकतर त्यामुळे लशीची परिणामकारकता वाढणार आहे. आणि आता ज्या परिस्थितीतून भारत जात आहे, अशा वेळी लवकरात लवकर जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करण्यासाठी ही रणनीतीच योग्य आहे.”

कोव्हिशिल्ड डोसमधलं अंतर वाढवण्याचा निर्णय आताच का घेतला?

मे महिना सुरू झाल्यापासून 18 ते 25 वयोगटातल्या लोकांचं लसीकरण सुरू झालं आहे. पण, सगळ्यांना पुरतील इतक्या लशीच देशात नाहीएत. काही राज्यांमध्ये तर त्यामुळे लसीकरण मोहीम तात्पुरती थांबवावी लागली. कोव्हिशिल्ड डोसमधलं अंतर वाढवण्याचा निर्णय म्हणून तर नाही ना घेतला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

नीती आयोगाचे आरोग्यविषयक सल्लागार डॉ. व्ही के पॉल यांनी काल पत्रकारांशी बोलताना याचं उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, “लशीमुळे लोकांना संरक्षण मिळावं अशी संशोधकांची इच्छा असते. आमचे निर्णय हे संशोधन अभ्यास यावर अवलंबून असतात. युकेमध्ये झालेल्या संशोधनात रियल लाईफ अनुभव म्हणजे प्रत्यक्ष लसीकरण सुरू झाल्यानंतरच्या अनुभवांचा अभ्यास झाला आहे. शिवाय आपल्या देशात आलेले अनुभव यानंतर लशीच्या दोन डोसमधलं अंतर वाढवण्याचा निर्णय झाला.”

थोडक्यात इथून पुढे तुम्हाला कोव्हिशिल्ड लशीचा दुसरा डोस हा 3 ते 4 महिन्यांनी घ्यायचा आहे. पण त्याचवेळी कोव्हॅक्सिनची लस मात्र तुम्हाला आधी ठरल्याप्रमाणे सहा आठवड्यांच्या अंतरानेच घ्यायची आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *